
लॉर्ड्सवर रंगणार ऐतिहासिक कसोटी:
भारत आणि इंग्लंड संघांत गुरुवारपासून लॉर्डसवर सुरू होणारी पहिली कसोटी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक कसोटी ठरणार आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला हा दोन हजारावा सामना आहे, तसंच भारत आणि इंग्लंड संघांत होणारा तो शंभरावा कसोटी सामना आहे.
२१ जुलै २०११ ही तारीख कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पंढरी म्हणून समल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या लॉर्डसवर खेळवला २०००वा कसोटी सामना जाणार आहे.
क्रिकेटच्या इतिहासाक हा नक्कीच एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागले. मात्र या ऐतिहासिक सामन्याना आणखीन एक आकडा तमाम क्रिकेटशौकीनांसाठी आणखी खास बनवू शकतो. तो आकडा आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाचा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या खात्यात सध्या ९९ शतकं जमा आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाला सचिनने आणखी खास बनवावं अशी करोडो भारतीयांची अपेक्षा आहे.
आजपासून १३४ वर्षांपूर्वी १८७७ मध्ये कसोटी क्रिकेटला सुरूवात झाली तेव्हा पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान खेळवला गेला होता. त्यानंतर यंदा १३४ वर्षांनी २०००व्या कसोटी सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पंढरीला म्हणजेच लॉर्डसला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी निवडण्यात आलं आहे.
तमाम भारतीयांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय संघ या २०००व्या कसोटी सामन्यात खेळत आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना २१ जुलैपासून सुरू होत आहे. हा मुकाबला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारत आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडमध्ये ही कसोटी होणार आहे.
यात आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा १०० कसोटी सामना आहे. तेव्हा सुवर्ण मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला तेजस्वी तारा म्हणजेच सचिनने आपल्या शंभराव्या शतकाला गवसणी घालावी अशी भारतीयांची अपेक्षा आहे.